वॉशिंग्टन : दोन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास नेदरलँडला रवाना झाले. मोदी तीन देशांच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. नेदरलँडनंतर ते भारतात परततील.


डच पंतप्रधान मार्क रुट यांच्यासोबत पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत आणि तिथले राजा व्हिल्यम अॅलेक्झेंडर आणि राणी मॅक्सिमा यांचीही मोदी भेट घेणार आहेत.

भारत आणि नेदरलँड यांच्यातील राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन्ही देशांतील या महत्त्वाच्या प्रसंगी मोदी नेदरलँडमध्ये हजर असतील. 2015 साली रुट आणि मोदी यांच्यात दिल्लीत मुलाखत झाली होती.

https://twitter.com/narendramodi/status/878247861678460928?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fabpnews.abplive.in%2Findia-news%2Fwashington-pm-narendra-modi-leaves-for-amsterdam-netherlands-643374

नेदरलँडचे पंतप्रधान रुट यांच्यासोबत चर्चेसाठी उत्सुक आहे. या चर्चेतून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर आणि मजबूत करण्यावर भर असेल. दहशतवादाच्या मुद्द्यावरही चर्चा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते.

नेदरलँडच्या दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी हे भारताचे चौथे पंतप्रधान आहेत. 1957 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु हे पहिल्यांदा नेदरलँडच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर 1985 साली राजीव गांधी, त्यानंतर 2004 साली डॉ. मनमोहन सिंग नेदरलँड दौऱ्यावर गेले होते.