अबुधाबी : भारतात 70 वर्षांपासून सुरु असलेली व्यवस्था बदलण्यास थोडा कालावधी जाईल, मात्र बदल नक्की घडून येतील, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीत केलं आहे. अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं.
अबुधाबीत भारतीय समुदायासमोर आपलं मनोगत व्यक्त करताना मोदींनी जीएसटी, नोटबंदी आणि इतर मुद्द्यांवर आपलं सरकार प्रामाणिकपणे काम करत असल्याचं सांगितलं.
आपल्या सरकारने घेतलेले प्रत्येक निर्णय हे सामन्य माणसाच्या हिताचे होते आणि त्या निर्णयांच्या बाजूने सामन्य माणूस उभाही राहिला. मात्र विरोधक अजूनही नोटाबंदीचा धक्का पचवू शकले नसल्याचं म्हणत मोदींनी काँग्रेसला पुन्हा एकदा लक्ष्य केलं. तुम्ही पाहत असलेलं स्वप्न एक दिवस नक्की प्रत्यक्षात अवतरेल, अशी हमी मोदींनी भारतीयांना दिली.
संयुक्त अरब अमिरातीत दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा दुसरा यूएई दौरा आहे. यापूर्वी 2015 मध्ये ते संयुक्त अरब अमिरातीत गेले होते.
अबुधाबी येथील हिंदू मंदिराच्या पायाभरणीचा सोहळा पार पडल्यानंतर मोदींनी भारतीय समुदायाशी संवाद साधला. सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीने मोदींनी वली अहद शहजादा मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचे आभार व्यक्त केले.
'हे हिंदू मंदिर फक्त वास्तुकला आणि भव्यतेच्या दृष्टीनेच अद्भूत नसेल, तर यातून वसुधैव कुटुंबकम हा संदेशही अख्ख्या जगाला मिळेल.' असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
50 हजार चौरस मीटर जागेवर अबुधाबीत पहिलं हिंदू मंदिर तयार होणार आहे. भारतीय शिल्पकार याची रचना करत असून 2020 पर्यंत मंदिर बांधून पूर्ण होईल. सर्वधर्मीयांसाठी हे मंदिर खुलं असेल, असंही मोदींनी सांगितलं.