ढाका : बांगलादेशच्या विरोधीपक्ष नेत्या आणि माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे.
अनाथाश्रमासाठी राखीव निधीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ढाका कोर्टाने शिक्षा ठोठावली आहे.


खलिदा झिया या बांगलादेशात विरोधीपक्षात असलेल्या नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)च्या नेत्या आहेत. झिया सत्तेत असताना 2 लाख 52 हजार डॉलर (अंदाजे 1 कोटी 62 लाख 4 हजार 860 रुपये) रक्कम अनाथाश्रमासाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र हा निधी चोरल्याप्रकरणी त्या दोषी आढळल्या.

राजकीय हेतूने आपल्यावर आरोप होत असल्याचा दावा झिया यांनी केला होता, मात्र त्या दोषी सिद्ध झाल्या. झियांची सामाजिक आणि शारीरिक स्थिती पाहून न्यायालयाने पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावला. झिया यांचा मुलगा तारीक रहमान आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना दहा वर्षांची तुरुंगवारी घडणार आहे.

राजधानी ढाकामध्ये विरोधीपक्षाचे समर्थक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये खडाजंगी झाली. झिया यांना सुनावणीसाठी ढाका कोर्टात नेण्यापूर्वी समर्थकांनी गोंधळ घातल्यामुळे पोलिसांवर अश्रूधुराचा वापर करण्याची वेळ आली.