लंडन : ‘बलात्कार हा बलात्कारच असतो, बलात्कार ही एक विकृती आहे.’ अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी कठुआ बलात्कारप्रकरणी दिली आहे. लंडनमधल्या ‘भारत की बात’ कार्यक्रमात ते बोलत होते.


कठुआमध्ये 8 वर्षीय बालिकेवर अत्यंत निर्घृण आणि निर्दयी पद्धतीनं बलात्कार करण्यात आला.  त्यानंतर आरोपींच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमधल्या बार काऊन्सिलनं मोर्चाही काढला. यामध्ये हिंदुत्तवाद्यांचा समावेश होता.  त्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती.

पंतप्रधान मोदी हे सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर असून त्यांनी या ‘भारत की बात’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेथील भारतीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं.

‘जो काम करतो त्याच्याकडेच देश अपेक्षेनं पाहतो’

‘जो काम करतो त्याच्याकडेच देश अपेक्षेनं पाहतो, त्यामुळे लोकं माझ्याकडून अपेक्षा बाळगून आहेत. मी स्वत:ला विसरुन देशाला समर्पण देतो.’ असंही मोदी यावेळी म्हणाले.

‘देशात आधीपेक्षा तीनपट रस्त्यांची बांधणी’

याचवेळी मोदींनी देशात विकास होत असल्याचा दावाही केला. ‘देशात आधीपेक्षा तीनपट रस्त्यांची बांधणी झाली आहे. आज देशभरात वेगाने रस्त्यांची कामं सुरु आहेत.’ असंही मोदी यावेळी म्हणाले.

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय... हेच ध्येय’

‘लोकशाहीमध्ये जनताच महत्त्वाची असते. त्यामुळे ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हेच माझं  ध्येय आहे. लोकशाहीची ताकद काय असते ते आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. देशाने ठरवलं तर चहावालाही पंतप्रधान बनतो.’  असंही मोदी म्हणाले.