औरंगाबाद : औरंगाबादपेक्षाही अमेरिकेत जमीन स्वस्त आहे असं सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार  नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना या छोट्याश्या राज्याचे वाणिज्य विभागाचे संचालक औरंगाबादेत येऊन आपल्या देशात जमिनीचे दर, वीजेचे दर कमी आहेत  हे कारण सांगत येथील उद्योजकांना अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना या राज्यात येऊन उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देत आहेत.


अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना राज्यातून आलेले तरुण गुप्ता  हे गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादच्या उद्योजकांसोबत संवाद साधत आहेत.

औरंगाबादेत जिथे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एकरभर जमिनीसाठी 50 लाख मोजावे लागतात. तिथे अमेरिकेच्या कॅरोलिनात फक्त 12 ते 13 लाख मोजावे लागतात.

राज्यात एक युनिट वीजेसाठी 6.50 रुपये द्यावे लागतात. तर कॅरोलिनात फक्त 4 रुपये. राज्यात व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक विभागांची परवानगी गरजेची असते तर अमेरिकेत फक्त आयकर विभाग आणि स्थानिक महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे.

दक्षिण कॅरोलिना अमेरिकेतील 43व्या क्रमांकाचं राज्य आहे. येथील लोकसंख्या ही फक्त 50 लाख आहे. इतक्या छोट्या राज्यात बॉश, बीएमडब्ल्यू, होंडा, व्होल्वो, मर्सिडीझ बेन्झ, बोईंग अशा 12 हजार कंपन्या आहेत. त्यामुळे आजवर गुजरात, कर्नाटकात जाणारे राज्यातले उद्योग उद्या अमेरिकेत गेले तर नवल वाटायला नको.