PM Modi America Visit: अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि फर्स्ट लेडी जिल बायडन (Jill Biden) यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुढील महिन्यात अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं बुधवारी यासंदर्भात माहिती दिली.
परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदींचा आगामी अमेरिका दौरा द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांचं वाढतं महत्त्व, खुल्या आणि मुक्त इंडो-पॅसिफिकबद्दल दोन्ही बाजूंचे विचार अधोरेखित करतो. परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, 22 जून रोजी त्यांच्यासाठी (पीएम मोदी) मेजवानीचं आयोजन केलं जाईल.
परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलंय?
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेला अधिकृत भेट देणार आहेत. ज्यामध्ये 22 जून 2023 रोजी राज्य मेजवानीचा कार्यक्रम समाविष्ट आहे." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदींचा हा दौरा होत आहे. असं म्हटले जात आहे की, पंतप्रधान मोदींच्या या भेटीमुळे दोन्ही देशांच्या एकूण आणि प्रगतीशील जागतिक धोरणात्मक युतीला आणखी घट्ट करण्याची मौल्यवान संधी मिळेल.
परराष्ट्र मंत्रालयानं मात्र अद्याप पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा तपशील दिलेला नाही. दौऱ्याच्या तयारीशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांच्या अमेरिका दौऱ्याचा कार्यक्रम अजून आखला जात आहे. 21 जूनपासून त्यांचा दौरा सुरू होण्याची शक्यता असून हा दौरा चार दिवसांचा असू शकतो.
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते?
निवेदनानुसार, या भेटीदरम्यान मोदी आणि बायडेन यांना व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, आरोग्यसेवा, संशोधन, लोकांशी संपर्क यासह समान हिताच्या द्विपक्षीय मुद्द्यांचा आढावा घेण्याची संधी मिळेल. त्यात म्हटलं आहे की, दोन्ही नेते भारत-अमेरिका युती मजबूत करण्यासाठी आणि G20 सह बहुपक्षीय मंचांवर सहकार्य वाढविण्याचे मार्ग शोधतील.
अमेरिका काय म्हणाली?
व्हाईट हाऊसनं सांगितलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन हे पंतप्रधान मोदींचे अमेरिकेत अधिकृत राजकीय भेटीसाठी स्वागत करतील. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी के जीन पियरे यांनी सांगितलं की, राष्ट्रपती 22 जून रोजी पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन करतील. ते म्हणाले की, भारतीय पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील सखोल आणि घनिष्ठ भागीदारी आणखी मजबूत होईल.