Imran Khan: सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानची परिस्थिती जगासमोर आली आहे. देशात आर्थिक अस्थिरता असताना दुसरीकडे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. इम्रान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक करण्यात आले आहे. अटकेच्या कारवाईनंतर इम्रान यांच्या समर्थकांनी देशभरात हिंसक आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.


तपास यंत्रणा नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) इम्रानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली आहे. त्यावर न्यायालयाने त्याला 8 दिवसांची कोठडी सुनावली आहे. इम्रान खान जेवढे मोठे राजकीय व्यक्तिमत्व आहेत, तेवढेच ते संपत्तीच्याबाबतही पुढे आहेत. कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक इम्रान खान यांची गणना पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांमध्ये केली जाते.


410 कोटींची संपत्ती 


क्रिकेटचे मैदान गाजवलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे 70 वर्षांचे आहेत. पाकिस्तानमधील siasat.pk या वेबसाइटनुसार, देशाचे 22 वे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारणारे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची एकूण संपत्ती $50 दशलक्ष आहे. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा 410 कोटी रुपयांच्या घरात आहे. तर पाकिस्तानी चलनात इम्रान खान यांची एकूण संपत्ती 1450 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. वृत्तानुसार, इम्रान खान यांनी वेगवेगळ्या व्यवसायांमध्येही मोठी रक्कम गुंतवली आहे. या व्यवसायांमधूनही त्यांना नफा मिळतो. 


क्रिकेटपटू...व्यावसायिक आणि राजकारणी


इम्रान खान हे पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू आहेत. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1992 चा विश्वचषक जिंकला होता. क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी चांगलीच कमाई केली. त्यानंतर त्यांनी व्यवसाय आणि राजकारणात आपली नवी इनिंग सुरू केली. बनिगालामध्ये एक आलिशान व्हिला इम्रान खान यांच्या मालकीचा आहे. त्याशिवाय इतर ठिकाणीही त्यांच्या नावावर घरं, बंगले आहेत. काही मालमत्ता या त्यांना वारसा हक्काने मिळाल्या आहेत. इम्रान खान यांच्याकडे जवळपास 600 एकर शेती आणि बिगरशेती जमीन आहे.


लाख किंमतीचे बोकडं आणि शेकडो एकर जमीन


पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यावर 2018 मध्ये सादर केलेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांच्या मालमत्तेत 4 बोकडांची उल्लेख केला आहे. त्यांची किंमत  सुमारे दोन लाख रुपये आहे. याशिवाय त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 6 कोटींहून अधिक रक्कम आहे. विशेष बाब म्हणजे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या स्वत: च्या मालकीचे हेलिकॉप्टरचे आहे. परंतु त्यांच्या नावावर कोणतीही कार नाही. 


इतर संबंधित बातमी: