हांगझोऊ : चीनच्या हांगझोऊमध्ये जी-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांची भेट घेणार आहेत. ओबामांच्या भेटीनंतर ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान थेरेसा मे यांचीही भेट भेणार आहेत. या परिषदेत काल जेवणावेळी मोदींची ओबामांशी अनौपचारिक भेट झाली होती.     बराक ओबामांनी जीएसटीबद्दलच्या मोदींच्या भूमिकेला एक साहसी निर्णय म्हणत कौतुकही केलं. मोदी या परिषदेच्या निमित्ताने विविध देशांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांची काल भेट घेऊन मोदींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर चर्चा केली.     या परिषदेदरम्यान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिंगपिंग यांचीही काल भेट झाली होती. या भेटीत एनएसजीमधील भारताच्या सदस्यत्वासोबतच चायना-पाकिस्तान ईकॉनॉमिक कॉरिडॉरवरही चर्चा झाली. त्यामुळे आज पंतप्रधान ओबामांशी काय चर्चा करणार याकडे लक्ष लागलं आहे.     या परिषदेदरम्यान बोलताना दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना वाळीत टाका असं म्हणत मोदींनी पाकिस्तानला टोला लगावला होता.