कराची : मानवतेसाठी आपलं सारं आयुष्य समर्पित करणारे पाकिस्तानमधील ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी कराचीमध्ये ईधींनी अखेरचा श्वास घेतला. ईधींच्या मृत्यूने मानवतेसाठी लढणारा ‘माणूस’ आज काळाच्या पडद्याआड गेला.

 

गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकारामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यातच श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी अँड ट्रांसप्लांटेशन मध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचं निधन झालं.

 

जवळपास 60 वर्षांपूर्वी वेलफेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सेवाकार्याला सुरुवात केली. त्यानंतर नर्सिंग होम, अनाथाश्रम, दवाखाने, वुमेन शेल्टर, पूनर्वसन केंद्र इत्यादींच्या माध्यमातून अब्दुल सत्तार ईधींनी शेवटच्या श्वासापर्यंत गरजू आणि गरीब जनतेची सेवा केली. पाकिस्तानसह जगातील अनेक देशांत ईधी फाऊंडेशनचं काम सुरु आहे.

 

अब्दुल सत्तार ईधींचा जन्म भारतात झाला. मात्र, फाळणीनंतर ते पाकिस्तानत गेले. मुळातच अंगात सेववृत्ती असलेल्या ईधींनी 1948 साली मिठादरमध्ये धर्मादय दवाखाना सुरु केला. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आपत्तीग्रस्तांसाठी सेवेचं जाळं विणून त्यांनी मानवतेचं मोठं काम केलं. भूकंप, पूर किंवा कोणतंही नैसर्गिक-मानवनिर्मित संकट असो, ईधी फाऊंडेशनची मदत सरकारी मदत पोहोचण्याआधी तिथे पोहोचते. निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एकम ठी फळी ईधींनी उभारली आणि त्यातून मानवसेवेचं काम करत राहिले. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्यांकडून ईधी फाऊंडेशनने देणगी स्वीकारली नाही.

 

रॅमन मॅगेसेसे, लेनिन पीस प्राईज यांसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने अब्दुल सत्तार ईधींना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.