नवी दिल्ली: टाईम मॅगझिननं जगभरातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांची लोकांची लिस्ट घोषित केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता आयुष्मान खुराणासह पाच भारतीयांनी स्थान मिळवलं आहे. सोबतच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, लंडनमधील एचआयव्हीवर संशोधन करणारे भारतीय वंशाचे डॉक्टर रवींद्र गुप्ता आणि शाहीन बाग आंदोलनातून चर्चेत आलेल्या बिल्किस दादीचं नाव देखील या यादीत आलं आहे. हे सर्व लोकं या वर्षी जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले आहेत.


टाईम मॅगझिननं पंतप्रधान मोदी यांच्याविषयी लिहिलं आहे की, लोकशाहीसाठी स्वतंत्र निवडणुकाच सर्वात आवश्यक नाहीत. यामध्ये केवळ कोणाला अधिक मतं मिळाली याची माहिती मिळते. यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण त्या लोकांचा अधिकार आहे, ज्यांनी विजेत्याला मत दिलं नाही. भारत गेल्या सात दशकांपासून सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या लोकसंख्येत अनेक धर्मांच्या लोकांचा समावेश आहे, असं म्हटलं आहे.


या यादीत आयुष्‍मान खुराणा हा एकमेव भारतीय अभिनेता आहे, जो जगातील सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत आलाय. यानंतर आयुष्माननं लिहिलं आहे की, टाईम्स मॅगझिनकडून घोषित केलेल्या या यादीत नाव आल्याने मोठा सन्मान मिळाल्यासारखं वाटत आहे. यावर त्याच्या फॅन्सनी त्याचं अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोननं देखील आयुष्मानचं अभिनंदन केलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्‍साई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.


सोबतच अमेरिकेतील राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन, अमेरिकेतील उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचीही नावं आहेत. तसंच या यादीत अमेरिकन शास्त्रज्ञ अॅंथनी फॉसी यांचंही नाव आहे. कोरोना काळात फॉसी यांच्या नावाची विशेष चर्चा आहे.