Plane Crashes Into Highway Video: भारतासह जगभरात विमान अपघातांची मालिका सुरुच आहे. भारत आणि बांगलादेशात विमान नागरी वस्तीत कोसळून मोठी जिवितहानी झाली असतानाच आता इटलीमधील ब्रेशियाजवळील A21 कॉर्डामोल-ओस्पिटेल महामार्गावर एक अल्ट्रालाईट विमान कोसळले. या अपघातात विमान चालवणारे 75 वर्षीय वकील सर्जियो रवाग्लिया आणि त्यांची 55 वर्षीय पत्नी अण्णा मारिया डी स्टेफानो यांचा मृत्यू झाला. तर 2 जण जखमी झाले. सुरुवातीच्या माहितीनुसार, वैमानिकाने आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु कमी वेगामुळे विमानावरील नियंत्रण सुटले. इटलीच्या राष्ट्रीय उड्डाण सुरक्षितता संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमान कोसळल्यानंतर हायवेवरील दोन धावत्या कारही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
विमानाच्या धडकेमुळे वाहनांना आग लागली
स्थानिक रहिवासी एन्झो ब्रेगोली म्हणाले की, विमान खूप खाली उडत होते आणि अचानक रस्त्यावर कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आग पसरली. विमानाच्या धडकेमुळे दोन कारना आग लागली ज्यामध्ये एका चालकाला गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तर दुसऱ्यावर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आणि दोन्ही बाजूंनी महामार्ग बंद करण्यात आला.
रशियाचं प्रवासी विमान चीनच्या सीमेवर कोसळलं
दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच चीनच्या सीमेजवळ एक रशियन प्रवासी विमान कोसळले. या अपघातात विमानातील 49 जणांचा मृत्यू झाला. विमानात 43 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. प्रवाशांमध्ये 5 मुलांचाही समावेश आहे. बचाव कर्मचाऱ्यांना टिंडा पासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर रशियन प्रवासी विमानाचे अवशेष सापडले. त्यापूर्वी बांगलादेशमध्येही विमान नागरी वस्तीत मोठी जिवितहानी झाली होती. भारतातही विमानामध्ये आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या