Israel Gaza starvation crisis: इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे गाझापट्टी पूर्णपणे बेचिराख झाली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून इस्रायली सैन्याकडून गाझापट्टीवर सतत हल्ले केले जात आहेत. इस्रायली सैन्याच्या बॉम्बहल्ल्यांमध्ये गाझा पट्टीतील अनेक रहिवासी इमारती आणि रुग्णालयांच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या. इस्रायलच्या या हल्ल्यात प्रचंड नरसंहार झाला होता. या सगळ्यानंतरही गाझापट्टीत अजूनही हमासचे दहशतवादी लपून बसल्याने इस्रायलने या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करुन ठेवली आहे. गाझापट्टीतील नागरिक बेघर झाल्याने जगभरातून त्यांच्यासाठी मदतीची ओघ सुरु आहे. परंतु, इस्रायलने नाकेबंदी केल्याने ही मदत आणि अन्नधान्यही सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे गाझापट्टीतील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याच्या घडीला गाझापट्टीत अन्नधान्याची प्रचंड टंचाई असून नागरिकांना दोन-तीन दिवसांतून एकदा अन्न मिळेल की नाही, याची खात्री नाही. या सगळ्यामुळे सध्या गाझापट्टीतील लहान मुलांच्या कुपोषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
इस्रायल आणि हमासमधील या संघर्षाची सर्वाधिक झळ लहान मुलांना बसत आहे. जागतिक खाद्य कार्यक्रम (WFP) या संस्थेच्या माहितीनुसार गाझापट्टीत सध्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे येथील जवळपास 70 हजार लहान मुलं कुपोषणाला बळी पडली आहेत. या मुलांना तात्काळ उपचारांची गरज आहे. या परिस्थितीत फरक न पडल्यास इस्रायलमध्ये हजारो नागरिकांचा जीव जाऊ शकतो, असा इशारा जगभरातील अनेक संस्थांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक भयानक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत एका आईच्या हातात लहान मुल दिसत आहे. अनेक दिवस अन्न न मिळाल्याने या मुलाचे कुपोषण झाले आहे. त्यामुळे या लहान मुलाचे शरीर म्हणजे हाडांचा सापळा झाला आहे. या फोटोत दिसणारी मुलाच्या पाठीच्या मणक्याची हाडं पाहून अंगावर अक्षरश: काटा उभा राहत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीनुसार, गाझापट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सध्या जिवंत असलेल्या लाखो लोकांना दररोज पिण्यासाठी पाणी आणि अन्न उपलब्ध नाही. लोकांना रोज टँकरमधून आणणारे पाणी प्यावे लागत आहे. त्यासाठीही प्रचंड धडपड करावी लागते. कुपोषणामुळे दररोज लहान मुलांचे मृत्यू होत आहेत.
आणखी वाचा