हाँगकाँग : हाँगकाँगमधील सोदबी ऑक्शनमध्ये एका दुर्मिळ प्रकारच्या गुलाबी हिऱ्याची विक्रमी किंमतीत विक्री झाली. या हिऱ्याला 7.1 कोटी डॉलर म्हणजे सुमारे 462 कोटी रुपयांची बोली लागली. हा एक नवा विक्रम आहे.


अंड्याच्या आकाराचा हा पिंक स्टार 59.6 कॅरेटचा आहे. लिलावाला सुरुवात होताच, अवघ्या पाच मिनिटातच त्याची विक्री झाली.

हाँगकाँगमधील चॉव ताई फूक इन्टरप्रायझेसने या हिऱ्याला बोली लावून तो विकत घेतला. लिलावासाठी उपलब्ध असलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पॉलिश हिरा आहे.

दरम्यान, जिनिव्हामध्ये 2013 मध्ये झालेल्या लिलावात या हिऱ्याला 8.3 कोटी डॉलरची बोली लागली होती. पण नंतर खरेदीदाराला तेवढे पैसे देता आले नाही.

हिऱ्यांची विक्री करणारे 77 डायमंड्सचे अलेक्झांडर ब्रेकनर यांनी सांगितलं की, "इतिहासातील हा सर्वात मोठा गुलाबी हिरा आहे. रंगामुळे हिऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे."

खरंतर विक्रीआधी सर्वात मोठ्या लिलावाचा विक्रम 'ओपनहायमर ब्लू' या हिऱ्याच्या नावे होता. मागील वर्षी मे महिन्यात 5 कोटी डॉलर म्हणजेच 235 कोटी रुपयांत या हिऱ्याचा लिलाव झाला होता.

या हिऱ्याची किंमत जवळपास सहा कोटी डॉलर असेल असा अंदाज होता. डी बीयर्सने 1999 मध्ये आफ्रिकेच्या बोत्सवानामधील खाणीतून हा हिरा शोधला होता. यानंतर स्टेनमेत्ज डायमंड्सने दोन वर्षात त्याला पैलू पाडून चमकावलं.

सुरुवातीला हा हिरा 132.5 कॅरेटचा होता. पण पैलू पाडून आणि पॉलिश करुन तो 59.60 कॅरेटचा झाला.