दमिश्क : सीरियाच्या इदलिब प्रांतात मंगळवारी रासायनिक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या लहान मुलांची असल्याचं समजतं आहे. तर या हल्ल्यामुळे 400 हून आधिकजणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

सीरियाच्या ऑब्जरवेटरी फॉर ह्यूमन राईटसि (SOHR) ने दिलेल्या माहितीनुसार, इदलिब प्रांतातातील खान शयखुन भागात हा हल्ला झाला.

इदलिब मीडिया सेंटरचा छायाचित्रकार हुसैनने AP या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता हा हल्ला झाला. या हल्ल्यादरम्यान स्फोटांचे मोठे आवाज झाले. यानंतर तो घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्याला अनेकजण जमिनीवर निपचित पडल्याचे दिसले. तसेच काहीजणांना चालायलाही त्रास होत होता. तर इदलिबमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या रुग्णवाहिकेचा सेवेचा प्रमुख मोहम्मद रसुलने बीबीसीला सांगितलं की, त्याच्या डॉक्टरांनी स्वत: च्या डोळ्यादेखत अनेकजणांना प्राण सोडताना पाहिलं.

या हल्ल्याची माहिती मंगळवारी एका फेसबुक पोस्टच्या माध्यामातून देण्यात आली होती. या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, क्लोरिन गॅसचे चार थर्मोबेरिक बॉम्बचा सीरियावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स आदी देशांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बसर-अल-असद यांना जबाबदार धरलं आहे. तर दुसरीकडे बंडखोरांनी हा हल्ला घडवून आणल्याचं सीरियाच्या सैन्य दलाने म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, सीरियाच्या भविष्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ब्रसेल्समध्ये दोन दिवसांच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र त्यापूर्वीच हा हल्ला झाला आहे. या संमेलनामध्ये युरोपीय संघांसोबतच संयुक्त राष्ट्र संघ सहभागी होणार आहेत.

दरम्यान, या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेलं विमान सीरियाची होती की, सरकारला सहकार्य करणाऱ्या रशियाची होती, हे अजून समजू शकलेलं नाही. पण या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.