मलीना : फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आईवरुन शिवी दिली. फक्त शिवीच नाही तर दुतर्ते यांनी ओबामांना खुलेआम धमकीही दिली. यानंतर ओबामांनी रॉड्रिगो डुटर्टे यांच्यासोबतची प्रस्तावित भेट रद्द केली.
"ओबामा स्वत:ला काय समजतात. मी एका स्वतंत्र देशाचा राष्ट्रपती आहे. माझी मालक केवळ फिलिपिन्सची जनता आहे. आम्हाला एकमेकांचा आदर करायला हवा. मी अमेरिकेच्या हातचं बाहुलं नसून जशास तसं उत्तर द्यायला तयार आहे," असं विधानही त्यांनी केलं.
मानवाधिकाराच्या मुद्द्यावरुन शिवी
मानवाधिकाराचं उल्लंघनाच्या मुद्द्यावर दोघांमध्ये शिवीगाळ झाली. ओबामा आणि डुटर्टे लाओसमध्ये आमनेसामने येणार आहेत. मात्र त्यांची भेट होण्याआधीच डुटर्टे यांनी ओबामांना आईवरुन शिवी दिली. रॉड्रिगो यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेने ओबामा-दुतर्ते भेट रद्द केली. डुटर्टे यांनी याआधी फिलिपिन्समधील अमेरिकेचे राजदूत फिलिफ गोल्डबर्ग यांना गे म्हणून संबोधलं होतं
ड्रग तस्करांना मृत्यूदंड
रॉड्रिगो डुटर्टे 30 जून रोजी फिलिपिन्सच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. सत्तेवर येताच त्यांनी एक लाख ड्रग्ज तस्करांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंड देणार असल्याची घोषणा केली. हे वचन पूर्ण करण्यासाठी डुटर्टे यांनी आतापर्यंत 2400 जणांना मृत्यूदंड दिला आहे.
रॉड्रिगो डुटर्टे यांच्या आदेशावर 2400 लोकांच्या हत्येनंतर जगभरात गदारोळ झाला आहे. मानवाधिकाराचं उल्लंघन केल्याने फिलिफिन्स अमेरिकेसह अनेक राष्ट्रांच्या निशाण्यावर आहे. जी-20 परिषदेतही रॉड्रिगो डुटर्टे यांनी ड्रग तस्करांविरोधातील लढाई सुरु ठेवण्याचा पुनरुच्चार केला.