मनिला : फिलिपिन्सच्या दक्षिणेकडील प्रांतात जवानांना घेऊन जाणारे एअर फोर्सचे सी -130 विमान कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या घटनेत मृतांची संख्या आता 45 वर गेली आहे. वृत्तसंस्था एएफपीने सैन्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सुलु प्रांतातील जोलो विमानतळावर दुपारी विमान कोसळण्याआधी आणि आग लागण्यापूर्वी काही सैनिक विमानातून उडी मारताना दिसले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात जमिनीवर असलेल्या सहा जणांना धडक बसली, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
फिलिपिन्सचे संरक्षणमंत्री डेल्फीन लोरेन्झाना म्हणाले की, बचावकार्य सुरू आहे. सैन्याने सांगितले की विमानात 96 लोक होते, त्यामध्ये तीन पायलट आणि चालक दलातील सदस्यांचा समावेश होता. लॉकहीड सी -130 हरक्यूलिस हे विमान यावर्षी फिलिपिन्सला लष्कराच्या मदतीसाठी दिलेल्या अमेरिकन हवाई दलाच्या दोन विमानांपैकी एक होते. चीफ ऑफ स्टाफ जनरल सिरिलिटो सोबेजाना म्हणाले की, रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सुलु प्रांतातील पाटीकुल या पर्वतीय शहरातील बांगकाळ गावात हे विमान कोसळले.
सैन्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की विमानात बसलेल्या किमान 50 जणांना सुलु आणि जवळच्या जोमबोआंगा शहरातील रुग्णालयात नेण्यात आले असून उर्वरित लोकांचा शोध घेण्यासाठी सैन्य दल प्रयत्न करत आहेत. सैन्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जमीनीवर पोहचण्यापूर्वी अनेक सैनिक विमानातून उडी मारताना दिसले. यामुळे अपघातानंतर स्फोटात येण्यापासून ते वाचले.
सैन्याने जाहीर केलेल्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये कार्गो विमानाची मागील बाजू दिसते. विमानाचे इतर भाग एकतर जळून गेले आहेत किंवा तुटून जवळपास विखुरलेले आहेत. अपघातातील ठिकाणाहून धूराचे लोट येताना दिसले होते. रेस्क्यू टिम तेथे स्ट्रेचरसह येत-जात असल्याचे दिसून आले.
हे विमान दक्षिणेकडील कागायन डी ओरो शहरातून सैन्याला सुलु येथे तैनातीसाठी घेऊन जात होते. मुस्लिम बहुल प्रांतात सुलूमध्ये अबू सय्यफच्या दहशतवाद्यांविरूद्ध सरकारी सैन्याने अनेक दशके लढा दिला आहे. विमान अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.
प्रादेशिक लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल कोलेटो वानलुआन म्हणाले की शत्रूंनी विमानावर हल्ला केला असण्याची शक्यता नाही. त्यांनी प्रत्यक्षदर्शींची हवाला देत सांगितले की विमान धावपट्टीसोडून पुढे गेले होते.