प्राग : चेक प्रजासत्ताकची दोनवेळची विम्बल्डन विजेती पेट्रा क्वितोवावर राहत्या घरी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात टेनिसस्टार क्वितोवा बालंबाल बचावली असून तिच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.


26 वर्षीय पेट्राच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला, त्यावेळी विरोध करणाऱ्या पेट्रावर चोरट्यांनी चाकूहल्ला केला. तब्बल चार तास तिच्या हाताच्या नसांवर शस्त्रक्रिया सुरु होती. हातावरील शस्त्रक्रियेमुळे तिला पुढील तीन महिने टेनिसपासून दूर राहावं लागणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनला तिला मुकावं लागेल.

गंभीर दुखापत असली तरी पेट्रा तरुण आणि हेल्दी आहे, त्यामुळे ती लवकर पुनरागमन करेल, अशी खात्री तिच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली. पुढील तीन महिने तिला डाव्या हाताने अवजड वस्तू उचलता येणार नाहीत, अशी माहिती आहे.

पेट्रावर हल्ला करणाऱ्या चोरट्याचा शोध पोलिस घेत आहेत. ती 'टेनिसस्टार पेट्रा क्वितोवा' आहे म्हणून तिच्यावर हल्ला झाला नसून चोरी एकमेव उद्दिष्ट असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

2011 आणि 2014 मधील विम्बल्डन विजेतेपदासोबत तिने एकूण 19 टायटल्स जिंकली आहेत. जागतिक क्रमवारीत क्वितोवा अकराव्या स्थानावर आहे. ऑक्टोबर 2011 मध्ये तिने कारकीर्दीतील सर्वोच्च म्हणजेच दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक पटकावलं होतं.

हल्ल्यानंतर पेट्राची पोस्ट :