दिल्ली : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांच्या यादीत नाव आलेल्या पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत अमेरिकेनं थांबवली आहे. त्यामुळे पाकला आणखी एक जोरदार झटका अमेरिकेनं दिला आहे. गेली अनेक वर्षं पाकिस्तानला अमेरिका आर्थिक मदत करत होती, ज्याचा वापर पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी करत होता.


दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिकेकडून ही आर्थिक मदत केली जात होती. मात्र त्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होत असल्यानं आता ही रक्कम रोखण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलाय.

2016 सालचे 350 दशलक्ष डॉलर्स अमेरिकेकडून पाकला मिळणं अपेक्षित आहे. मात्र अमेरिकेच्या या निर्णयानं पाकची गोची झाली आहे. कारण अमेरिकेनं मदत थांबवल्यानं जवळपास अडीच हजार कोटींवर पाकला पाणी सोडावं लागणार आहे. हक्कानी नेटवर्कविरोधात पाकिस्तानने प्रभावी कारवाई न केल्याचा अहवाल अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांनी अमेरिकी काँग्रेसला दिला होता.

पाकिस्तानला 2016 मध्ये एकूण 900 दशलक्ष डॉलर्स रक्कम अमेरिका देणार होती. मात्र अमेरिकेनं फक्त 550 दशलक्ष डॉलर्स इतकीच रक्कम पाकला दिली आहे. पाकला उरलेले 350 दशलक्ष डॉलर्स न देता बाकीच्या कामांमध्ये गुंतवले आहेत.