मुंबई : चीनमध्ये एका तरुणीला 102 आयफोनच्या तस्करीच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. आयफोनशिवाय मुलीकडून हातातील तीन महागडी घड्याळंही जप्त करण्यात आली आहेत. ही तरुणी हाँगकाँगमधून चीनच्या शेंझेनमध्ये या वस्तूंची तस्करी करायला जात होती.


मेटल डिटेक्टरमधून वाचली, पण...
हाँगकाँगमधून चीनला पोहोचलेल्या या तरुणीने अशाप्रकारे आयफोन लपवले होते की, मेटल डिटेक्टरला ते पकडता आले नाहीत. ही तरुणी तिथून पळ काढणारच होती, पण तिथल्या अधिकाऱ्यांची तिच्या शरीराच्या आकारावर नजर गेली. तरुणीचे हात पाय बारीक होते. त्यामुळे तिचं शरीरही बारीकच असायला हवं, असा विचार अधिकाऱ्यांच्या मनात आला. नीट पाहिल्यानतंर तिच्या कमरेजवळचा भाग बेडौल दिसत होता. त्यांनी तिला थांबवलं. जेव्हा अधिकारी महिलेने तरुणीच्या शरीराची तपासणी केली, तेव्हा आयफोनच्या तस्करीचा खुलासा झाला.

वेगवेगळ्या किंमतीचे आयफोन
हे पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. मुलीच्या कपड्यांमधून एकामोगामाग एक असे 102 आयफोन आणि तीन महागडी घड्याळं सापडली. जप्त केलेले आयफोन वेगवेगळ्या मॉडेलचे आणि वेगवेगळ्या रंगाचे आहेत. त्यांच्या किंमतीबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

याआधीही अनेकांना आयफोनच्या तस्करीत अटक
चीनच्या तुलनेत हाँगकाँगमध्ये गॅजेट्स अतिशय स्वस्त आहेत. त्यामुळे चीनमध्ये आयफोनच्या तस्करीची बाब सामान्य आहे. याआधीही सप्टेंबर, 2016 मध्ये अशाप्रकारे एका मुलाला 84 आयफोनची तस्करी करताना अटक केली होती. तर भारतात दिल्ली विमानतळावरही एका तरुणाला 33 आयफोनची तस्करी करताना पकडलं होतं. हे आयफोनही हाँगकाँगवरुनच भारतात आणले होते.