न्यूयॉर्क : फोर्ब्जने ग्लोबल बिलियनेअर्स म्हणजेच जागतिक अब्जाधीशांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या यादीत यंदा 119 भारतीयांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, या यादीत पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा सर्वात तरुण अब्जाधीश ठरले आहेत. तर सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून एल्केम लॅबोरेटरीजचे निवृत्त संचालक संप्रदा सिंह यांचा समावेश झाला आहे.

फोर्ब्सच्या या यादीत 119 भारतीयांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी 19 व्या स्थानी मिळाले आहे. गेल्या वर्षी ते 33 व्या स्थानावर होते. पण यंदा त्यांच्या संपत्तीत 16.9 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1.1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सध्या त्यांच्याकडे 40.1 अब्ज डॉलर ( जवळपास 2.61 लाख कोटी रुपये) संपत्ती असल्याचे फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत सांगितले आहे.

विशेष म्हणजे, या यादीत सर्वात कमी तरुण व्यक्ती म्हणून पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा (39) यांचा समावेश झाला आहे. विजय शर्मा यांना 1394 वे स्थान मिळाले आहे. त्यांच्याकडे 1.7 अब्ज डॉलर संपत्ती आहे.

तर एल्केम लॅबोरेटरीजचे निवृत्त संचालक संप्रदा सिंह (92) हे सर्वात ज्येष्ठ भारतीय ठरले आहेत. त्यांना 1867 वे स्थान मिळाले आहे. त्यांनी आपल्या एल्केम लॅबोरेटरीजची स्थापना 45 वर्षांपूर्वी केली होती. स्वत: चा व्यावसाय सुरु करण्यापूर्वी ते एका मेडिकलमध्ये काम करत होते.

दरम्यान, या यादीत काही महिलांनाही स्थान मिळाले आहे.यात सावित्री जिंदल, किरण मजुमदार-शॉ, स्मिता कृष्णा गोदरेज, लीना तिवारी, अनु आगा, शीला गौतम आणि मधु कपूर आदींचा समावेश आहे.