न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे 'फोर्ब्ज'च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प यांचं स्थानं 222 क्रमांकाने घसरलं आहे.

फोर्ब्जच्या ग्लोबल बिलियनेअर्स म्हणजेच जागतिक अब्जाधीशांच्या यादीत गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प 544 व्या क्रमांकावर होते. मात्र हा आकडा घसरुन 766 वर पोहचला आहे. ट्रम्प यांची मालमत्ता 400 मिलियन डॉलरनी (अंदाजे 2 हजार 598 कोटी रुपये) कमी होऊन 3.1 अब्ज डॉलर (20 हजार 136 कोटी) वर पोहचली आहे.

ई-कॉमर्स क्षेत्राने जोर धरल्यामुळे ट्रम्प टॉवर सारख्या मालमत्तांच्या किमती कमालीच्या कमी झाल्या आहेत. ट्रम्प यांच्या सुप्रसिद्ध बिल्डिंगच्या किमतीत 2.66 अब्ज रुपयांनी घट झाली आहे, असं फोर्ब्जने म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी 2015 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी 10 अब्ज डॉलरचं नेट वर्थ असल्याचा दावा केला होता. ते अमेरिकेचे पहिले अब्जाधीश अध्यक्ष आहेत. अर्थात व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतानाच त्यांनी वैयक्तिक व्यवसायापासून फारकत घेतली होती.