नवी दिल्ली : जगभरातल्या पत्रकारांनी मिळून पनामा पेपर्स या नावाने ब्लॅकमनी साठवण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. पत्रकारितेच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट मानला जातोय. पनामा पेपर्स या नावाने हा गौप्यस्फोट आज जगातील सर्वात मुख्य चर्चेचा विषय आहे.

 

जगभरातील अतीश्रीमंत सत्ताधीश, राजकारणी आणि उद्योगपती यांनी आपला ब्लॅकमनी कसा परदेशी पाठवला आहे, याचा खुलासा या पनामा पेपर्समधून करण्यात आलाय. जगभरातील हुकूमशहा आणि सत्ताधीशांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचंही नाव आहे. त्याशिवाय युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक, लिबियाचे मोहम्मद गडाफी, सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचा समावेश आहे.

 

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय, आईसलँडचे पंतप्रधान तसंच सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या काळ्या पैशाबाबत पनामा पेपर्समध्ये उल्लेख आहे.

 

पनामा पेपर्समध्ये भारतातील कोण कोण आहे?

 

भारतात बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन,  डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा पनामा पेपर्समध्ये समावेश असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलंय.

 

इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स (ICIJ) आणि ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) या दोन प्रकल्पातील पत्रकारांनी घेतलेल्या शोधमोहीमेतून हा गौप्यस्फोट झालाय. जागतिक शोध पत्रकार समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस असल्याचं सांगितलं जातं.

 

https://twitter.com/Snowden/status/716683740903247873

 

इंडियन एक्स्प्रेसने आज प्रकाशित केलेल्या बातमीत बच्चन कुटुंबीय, अडाणी आणि केपी सिंह यांच्यासह अन्य 500 भारतीय नावांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आलाय. इंडियन एक्स्प्रेसच्या दाव्यानुसार, पश्चिम बंगालमधील राजकारणी शिशीर बाजोरिया लोकसत्ता या पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनुराग केजरीवाल यांचाही समावेश आहे.

 

पनामा पेपर्स काय आहे?

 

पनामा पेपर्स काल रात्रीपासून ट्वीटरसह अन्य सोशल मीडियावर जगभरात टॉप ट्रेडिंगमध्ये आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये आज हाच विषय प्रामुख्याने चर्चिला जात आहे.

 

पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केलाय. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही.

 

11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागलेत. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं.

 

यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.