वलेत्ता : पनामा पेपर्समधून अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करुन जगाला हदरवून सोडलेल्या महिला पत्रकाराची हत्या झाली आहे. पत्रकार डॅफनी कॅरुआना गलिजिया यांच्या कारमध्ये मंगळवारी स्फोट झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला.


आधिक माहितीनुसार, दक्षिण युरोपमधील बेटावरील माल्टा देशात स्थाईक झालेल्या डॅफनी आपल्या घरातून उत्तर माल्टाकडे कारमधून निघाल्या. त्यावेळी अचानक त्यांच्या कारमध्ये स्फोट झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

डॅफनी एक स्वतंत्र ब्लॉगर होत्या. आपल्या ब्लॉगमधून त्यांनी भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचा खुलासा केला होता. त्यामुळे त्यांना लेडी विकिलिक्सदेखील म्हटलं जात होतं. मृत्युपूर्वी त्यांनी एक ब्लॉग प्रसिद्ध केला होता. या ब्लॉगमध्ये त्यांनी ‘इथं सर्वत्र बदमाश लोक आहेत. तसेच परिस्थिती भयंकर आहे,’ असंही म्हटलं होतं.

डॅफनी यांच्या मृत्यूनंतर माल्टामधील तीन हजार नागरिकांनी कॅण्डल मार्च काढून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कट यांनीही डॅफनी यांच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

पत्रकारांची हत्या म्हणजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. एक पत्रकार म्हणून त्या माझ्या विरोधक होत्या. पण त्यांच्या हत्येचा निषेधच करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

डॅफनी यांनी 2016 मध्ये पनामा पेपर्समध्ये माल्टासंदर्भात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. या गौप्यस्फोटांमध्ये आईसलँड, युक्रेनचे राष्ट्रपती, साऊदी अरेबियाचे शाह आणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांच्या वडिलांच्या नावाचा समावेश होता.

याशिवाय, रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांचे निकटवर्तीय, अभिनेता जॅकी चेन आणि फुटबॉलपटू लायनल मेसी यांच्याही नावाबाबत अनेक खुलासे करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, पनामा पेपर प्रकरणामुळे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.