लाहोर : पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये राहणारी हुमा मोबिन सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आलीय. पतीशिवाय एकटीच हनिमूनला जाणाऱ्या हुमाचे आगळेवेगळे फोटो गेल्या दोन दिवसात इंटरनेटवर सर्वात जास्त पाहिले गेलेले फोटो ठरलेत.

 

दोन वर्षांपूर्वी आलेल्या क्वीन चित्रपटातील एकटीच हनिमूनला जाणारी कंगना आजही अनेकांना भुरळ घालते. अशीच एक क्वीन सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. मात्र या क्वीनची स्टोरी जरा हटके आहे.

 
लाहोरमध्ये राहणारी हुमा मोबिन एकटीच हनिमूनला गेली. तिथल्या प्रत्येक पर्यटनस्थळी तिला तिच्या पतीची आठवण आली. मग काय त्याच्या आठवणीत, त्याच्याशिवायचे फोटो तिनं काढले आणि सोशल मीडियावर अपलोड केले.तिच्या या फोटोंनी अवघ्या काहीच वेळात तिला सोशल नेटवर्किंगची क्वीन बनवून टाकलं.

 

हुमा आणि तिचा पती अरसलान त्यांच्या सेकंड हनिमूनसाठी ग्रीसला जाणार होते. खूप आधीपासून त्यांचा हा प्लॅन तयार होता. या टूरसाठी त्यांनी पैसेही भरले होते. मात्र ऐनवेळी अरसलानला व्हिसा मिळाला नाही...आणि हुमाला एकटीलाच ग्रीसला जावं लागलं.

 

हुमाला या फोटोशूटची आयडिया तिच्या पतीनंच दिली होती. त्यांच्या एन्गेजमेंटनंतर त्यालाही एकट्यालाच बुडापेस्टला जावं लागलं होतं. तिथून त्यानं हुमाला असे फोटो पाठवले होते.

 
हुमाच्या या हनिमून फोटोजना आतापर्यंत हजारो लाईक्स आणि शेअर मिळालेत. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात असा हनिमून नको गं बाई असंच प्रत्येकाला वाटत असेल.