नवी दिल्ली : दहशतवादी बुरहान वानीच्या खात्मानंतर पाकिस्ताने थयथयाट सुरु केला आहे. मात्र भारताने पाकिस्तानची नौटंकी थेट संयुक्त राष्ट्रांत उघडी पाडली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी, दहशतवादावरुन पाकिस्तानच्या बोगस मानवाधिकाराचा बुरखा टराटरा फाडला.


 

बुरहान वानीच्या खात्मानंतर गळा काढणारा पाकिस्तान, हा दहशवाद्याचा गड असल्याचा हल्लाबोल अकबरुद्दीन यांनी केला. काश्मीरमधील मानवाधिकाराची गोष्ट करणाऱ्या पाकिस्तानने स्वत:च्या घरात वाकून बघावं. जो देश स्वत:चं सोडून नेहमीच दुसऱ्या देशांकडे बघत असतो, त्याने मानवाधिकार शिकवू नये, असा खणखणीत टोला, अकबरुद्दीन यांनी संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन लगावला.

 

अकबरुद्दीन यांच्या या जबरदस्त वक्तव्यानंतर ते ट्विटरवर ट्रेण्ड होत आहेत.

 

संयुक्त राष्ट्राने ज्यांना दहशतवादी घोषित केलं आहे, त्यांनाच पाकिस्तान गोंजारतो. जगाने पाकिस्तानची ही खेळी समजली आहे. मात्र आता त्याचा यूएनवर परिणाम होणार नाही, असंही अकबरुद्दीन म्हणाले.

 

पाकिस्तान तोच देश आहे, जो संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कौन्सिलमधील सदस्यत्वासाठी पात्रता सिद्ध करण्यास अपयशी ठरला. मात्र विविधेत एकता, सहिष्णूतेच्या रुपात भारत लोकशाही आणि मानव अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे, असंही अकबरुद्दीन यांनी ठणकावून सांगितलं.

 

बुरहानच्या खात्माचं पाकिस्तानला दु:ख

 

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी बुरहान वाणीचा भारतीय लष्कराने खात्मा केला होता. त्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बुरहानच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला होता.

 

मात्र पाकिस्तानची ही चाल भारताने यूएनमध्ये उघडी पाडली.