Pakistan Train Accident : पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानातील घोटकीमध्ये रेती आणि डहारकी रेल्वे स्थानकां दरम्यान, सर सैय्यद एक्सप्रेस ट्रेन, मिल्लत एक्सप्रेस या दोन एक्सप्रेस ट्रेन एकमेकांवर धडकल्या आणि भीषण अपघात झाला. या अपघातात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची शंका व्यक्त केली जात आहेत. पाकिस्तानच्या स्थानिक न्यूज चॅनलनं दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 


घटनास्थळी मदतकार्य सुरु, मृतांचा आकडा वाढण्याची भिती


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झालं असून मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. पाकिस्तानातील रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सरगोध्याला जाणारी सर सैय्यद एक्सप्रेस समोर येणाऱ्या मिल्लत एक्सप्रेसवर जाऊन धडकली, त्यावेळी ही दुर्घटना घडली. घोटकीच्या डीसी उस्मान अब्दुल्ला यांनी सांगितलं की, आतापर्यंत या अपघातात 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन्ही ट्रेन्सच्या डब्ब्यांमध्ये अनेक प्रवासी अडकलेले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झालं असून मदकार्य सुरु आहे. 


पाकिस्तान रेंजर्स सिंधचे सैनिकही मदकार्यासाठी घटनास्थळी दाखल 


डीसी उस्मान अब्दुल्लाने म्हटलं की, मदकार्यासाठी मशीन्स आणि कटर्सची गरज आहे. हा अपघात अत्यंत भीषण आहे. भीषण अपघातानंतर अप आणि डाऊन रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अशातच मदकार्यासाठी घटनास्थळी पाकिस्तान रेंजर्स सिंधचे सैनिकही पोहोचले आहेत. जखमींवर जवळच्याच रूग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अनेकजण ट्रेनच्या डब्ब्यांमध्ये अडकले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :