इस्लामाबाद : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव सुरु असताना, पाकिस्तानने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र 'गझनवी'चं आज यशस्वी प्रक्षेपण केलं. कराचीजवळ सोनमियानी परीक्षण केंद्रावरुन या क्षेपणास्त्राचं परीक्षण करण्यात आलं. काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसा पाठिंबा न मिळाल्याने पाकिस्तानने आधीच बॅलेस्टिक क्षेपणास्त्र परीक्षणाची धमकी दिली होती.

पाकिस्तानी सैन्याकडून परीक्षणाची माहिती
पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी परीक्षणाच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी ट्वीट केलं केली, पाकिस्तानने यशस्वीरित्या जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्यासाठी सक्षम बॅलेस्टिक क्षेपणास्त्र गझनवीचं परीक्षण केलं. हे क्षेपणास्त्र 290 ते 320 किमीपर्यंत मारा करण्यासाठी सक्षम असून 700 किलोग्रॅम स्फोटकं घेऊन जाऊ शकतं. याच्याच परीक्षणासाठी पाकिस्तानने आपलं कराची विमानतळ बंद केलं होतं.


काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न
जम्मू काश्मीरबाबत भारत सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला होता. काश्मीरचा मुद्दा जागतिक स्तरावर नेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. तसंच भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचं वातावरण निर्माण करुन जगाचं लक्ष जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर केंद्रीत करण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे.

कराची एअरस्पेस बंद करुन पाकिस्तानचे संकेत
पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने बुधवारीच (28 ऑगस्ट) कराची विमानतळाचे तिन्ही मार्ग 28 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद केले आहेत. तसंच नोटीस टू एअरमन (NOTAM) जारी करुन सर्व बंदरांवर सतर्कतेचा इशारा दिला होता. पाकिस्तानची ही तयारी पाहता कराचीजवळ सोनमियानी टेस्ट रेंजमध्ये क्षेपणास्त्राचं परीक्षण करणार असल्याची कुणकुण लागली होती.

बालाकोट हल्ल्यानंतरही विमानतळ बंद
त्याआधी बालाकोटमध्ये भारताच्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने फेब्रुवारी महिन्यात आपली विमानतळं पूर्णत: बंद ठेवली होती. यानंतर 27 मार्च रोजी नवी दिल्ली, बँकॉक आणि क्वालालम्पूर वगळता इतर उड्डाणांसाठी विमानतळ सुरु केली.