मेक्सिको : शनिवारी मेक्सिकोमधील एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी तिच्या घराच्या बाल्कनीतून तब्बल 80 फुटांवरुन खाली पडली आणि नशिबाने ती वाचली सुद्धा. ब्रिटीश वर्तमानपत्र डेली मेलच्या वृत्तानुसार, सॅन पेद्रो येथे अलेक्सा टेराझा ही तरुणी आपल्या घरातील बाल्कनीच्या काठावर योगासन करत होती. बाल्कनीच्या कडप्प्यावर शिर्शासनासमान एक आसन करण्याचा तिने प्रयत्न केला, याचा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र पाहायला मिळतोय. खाली पडण्यापूर्वी तिच्या मित्राने हा फोटो काढला होता.
सुमारे दुपारी एकच्या दरम्यान बाल्कनीतून तोल जाऊन ती खाली पडली. अलेक्साला ताबडतोब रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले, अकरा तास तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या गुडघ्यांना गंभीर जखम झाल्याने तिला तीन वर्ष चालता येणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. भयानकरित्या पडल्याने तिचे दोनही पाय आणि हात फ्रॅक्चर झाले आहेत. या दुखापतीत तिच्या शरीरातील 110 हाडं तुटली आहेत, सोबतच तिच्या कंबरेला आणि डोक्यालाही इजा झाली आहे.
अलेक्साच्या शरीरात आता रक्ताची कमतरता निर्माण झाल्याने तिच्या कुटुंबाने सोशल मीडियावर लोकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. जवळजवळ शंभर रक्तदात्यांचा या पोस्टला प्रतिसाद मिळाला. दोन दिवस उलटल्यानंतरही तिची प्रकृती अद्याप गंभीरच असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर त्या बाल्कनीच्या बांधणीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष आढळला नाही. अलेक्साने स्वत:हून हा प्रयत्न केला असल्याने इमारतीच्या बांधकामाचा तिच्या पडण्याशी तसा संबंध नव्हता. मेक्सिकोच्या या अपघातानंतर असे भयानक स्टंट्स करणं किती महागात पडू शकतं हे दिसून आलं. योगासन करण्यात काहीच गैर नाही मात्र ती करताना योग्य ती काळजी घेणं आणि सावधानता पाळणं नक्कीच गरजेचं आहे.
तब्बल 80 फुटांवरुन डोक्यावर पडूनही तरुणी जिवंत, योगा करताना तोल गेला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2019 11:17 PM (IST)
अलेक्साला ताबडतोब रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले, अकरा तास तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या गुडघ्यांना गंभीर जखम झाल्याने तिला तीन वर्ष चालता येणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -