वॉशिंग्टन : पाकिस्तानच्या सततच्या दहशतवादी कारवायांमुळे त्रस्त झालेल्या भारताने सर्जिकल स्ट्राईक करत पाकव्याप्त काश्मीरमधील 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर आता पाकिस्तानातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यातच, पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचं विधान आलं आहे. मात्र, या विधानातून ते पुरते बिथरल्याचंच दिसून येतं आहेत.


भारताने दिलेल्या धमकीच्या बदल्यात पाकिस्ताननेही धमकी द्यायला हवी, असे मशर्रफ म्हणाले.

1999 साली कारगील युद्धाचे सूत्रधार आणि पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ म्हणाले, उरी हल्ल्यानंतर भारतातील राजकीय नेत्यांनी पाकिस्तानबाबत मोठी विधानं केली, धमक्या दिल्य आहेत. मी बदल्यात भारताला धमकीच दिली असती.

जेव्हा मुशर्रफ यांना 'धमकी'बाबत विचारले गेले, त्यावेळी ते म्हणाले, "आम्ही आमच्या पसंतीने, वेळ ठरवून आम्ही निवडलेल्या ठिकाणी हल्ला करु, अशी धमकी भारताने दिली. हे कुणी दुसरं-तिसरं नव्हे, तर भारताचे पंतप्रधान, संरक्षणमंत्री, लष्करी अधिकारी आणि डीजीएमओने म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे."

"आता पाकिस्तान काय करेल? तर आम्हीही आमच्या निवडलेल्या ठिकाणी आणि वेळेनुसार हल्ला करु." शिवाय, मुशर्रफ म्हणाले, "या सर्व गोष्टींमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. युद्ध परिस्थिती पाकिस्तानात नव्हे, तर भारतात निर्माण केली जात आहे. भारत नेहमीच असं करतं, हे काही आजचं नाहीय."

दरम्यान, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या विधानावरुन हे स्पष्ट दिसतंय की, पाकिस्तान भीतीच्या वातावरणात आहे. स्वत: मुशर्रफही भारताची धमकी आता गांभिर्याने घ्यायला लागले आहेत.