वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या 18 वर्षांपासून करच भरला नसल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेतील 'न्यूयॉर्क टाइम्स' या वृत्तपत्राने हा खुलासा केला आहे. त्यामुळे निवडणूक तोंडावर असताना ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ट्रम्प यांनी कराचा तपशील देण्यासाठी या अगोदरच नकार दिला होता. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला कराची माहिती सार्वजनिक करणं बंधनकारक असतं, मात्र ट्रम्प यांनी त्यास नकार दिला होता. यावरुन त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकाही झाली. प्रसिद्ध उद्योजक असलेल्या ट्रम्प यांनी 916 मिलियन डॉलर एवढा शेवटचा कर 1995 मध्ये भरला होता.
ट्रम्प यांच्या कराविषयी मिळवलेली माहिती अवैध पद्धतीने मिळवण्यात आली आहे. हिलरी क्लिंटन यांना फायदा मिळवून देणं हा यामागचा उद्देश आहे, असा आरोप ट्रम्प यांच्या टीमकडून करण्यात आला आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 8 नोव्हेंबर रोजी होत आहे.