इस्लामाबाद : पाकिस्तानच्या वरिष्ठ पत्रकार मार्वी सरमद यांना एका चर्चेच्या कार्यक्रमात पाकिस्तान सिनेटच्या सदस्याने ऑन कॅमेरा धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. मार्वी यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटरवरुन शोदरम्यान झालेल्या मनस्तापाला वाचा फोडली आहे.


 
पाकिस्तानी न्यूज चॅनेल 'न्यूज वन'वर नादिया मिर्झा यांच्या टॉक शोमध्ये सिनेट सदस्य हाफिज हमदुल्लाह, वरिष्ठ पत्रकार मार्वी सरमद यांच्यासह दोन व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं. हाफिज हमदुल्लाह त्यांच्या कोपिष्ट स्वभावासाठी ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी टीव्ही शोमध्ये चर्चेला आलेल्या काही व्यक्तींना धमकावलं आहे.

 

 

चर्चा सुरु असताना मसरुर यांच्या एका वक्तव्यामुळे हमदुल्लाह यांचा पारा चढला. त्याचवेळी मार्वी यांनी त्यांचं मत मांडायला सुरुवात केली होती, मात्र त्यांना तोडून हमदुल्लाह यांनी आवाज चढवला आणि वादाला तोंड फुटलं.

 

 

मार्वी यांच्या फेसबुक पोस्टनुसार हमदुल्लाह यांनी अत्यंत अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ केली. इतकंच नाही, तर 'तुम्हारी सलवार उतार दुंगा और तुम्हारी माँ की भी' यासारखी खालच्या पातळीची भाषा वापरण्यापर्यंत त्यांची मजल गेली. ही बलात्कारी जाहीर धमकी असल्याचा दावा मार्वी यांनी केला आहे.

 

 



 
'तुमच्याच कुटुंबातील एखाद्या महिलेशी अशी वर्तणूक करा' असं उत्तर मार्वी यांनी दिल्यानंतर हमदुल्लाह त्यांच्या अंगावर धावून आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हमदुल्लाह यांनी मार्वी यांना ठोसा मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

 

 
विशेष म्हणजे हा सगळा प्रकार ऑन कॅमेरा रेकॉर्ड झाल्यामुळे मार्वी यांच्या आरोपांना बळ मिळालं आहे. त्याचप्रमाणे हमदुल्लाह यांच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता आहे.

 

 



 

पाहा व्हिडिओ :