लाहोर : पाकव्याप्त काश्मीरात भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. कराचीच्या हवाई हद्दीतून 33 हजार फुटाखालून विमान उड्डाणाला पाकिस्तानने बंदी घातली आहे. त्यातच आता लाहोरच्या हवाई हद्दीतूनही व्यावसायिक जेट विमानांना 29 हजार फुटांखालून उडण्यास पाकने मनाई केली आहे.
कराचीच्या हवाई हद्दीतून विमान प्रवासाला घातलेली बंदी आठवड्याभरासाठी आहे, तर लाहोरच्या अवकाशातून उडण्यास 31 ऑक्टोबरपर्यंत मज्जाव घालण्यात आला आहे. कराची हे राजस्थान आणि गुजरातच्या सीमेनजीक आहे, तर लाहोर हे जम्मू काश्मीर
आणि पंजाबच्या जवळ आहे.
'ऑपरेशनल रिझन्स' असं पाकिस्तानने हवाई क्षेत्रातून विमानांना उड्डाण करण्यास बंदी घालण्याचं कारण पुढे केलं आहे. पाकच्या निर्णयामुळे पश्चिमेकडील आणि आखाती देशात जाणाऱ्या विमानांना त्रासदायक ठरु शकतं. पाकिस्तानला वळसा घालून जावं लागणार असल्याने या विमानांना प्रवासासाठी विलंब होईल.
पाकिस्तानी हवाई दल त्यांची ताकद आजमावण्यासाठी कसरती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच पाकच्या हवाई हद्दीतून प्रवास करण्यास विमानांना बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी विमानांना भारताच्या हवाई हद्दीतून प्रवेश देण्याबाबत भारतीय सरकार विचार करत आहे.