न्यूयॉर्क: ऐतिहासिक पॅरिस जयवायू करारावर भारताच्या मान्यतेनिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात विशेष सोहाळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अनेक सन्मानित व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांनी जागतिक तापमान वाढीच्या विरोधातील लढ्यात भारताने दिलेल्या सहकार्याबद्दल अभिनंदन केलं.


या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्नाटकातील प्रसिद्ध गायिका सुधा रघुनाथन यांनी आपली कला सादर केली. यावेळी महासभेचे अध्यक्ष पीटर थॉमसन, उपमहासचिव जान एलियासन, बांगलादेशचे वित्तमंत्री अबुल माल मुहिथ, संयुक्त राष्ट्रामधील भारताचे माजी दूत हरदीप सिंह पुरी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी महासभेचे अध्यक्ष पीटर थॉमसन यांनी आपल्या भारत दौऱ्यातील नवी दिल्लीतील गांधी स्मारकाच्या भेटीची माहिती दिली. या भेटीत त्यांनी राजघाटावरील गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेऊन तिथे काहीकाळ घालवला असल्याचे सांगितलं.

पॅरिस कराराला भारताची मान्यतेमुळे आनंद होत असल्याचं अध्यक्ष पीटर थॉमसन यांनी यावेळी बोलाताना सांगितलं. तसेच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनीही भारताने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.