लाहोर: भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आता पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग आला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी आज त्यांच्या लढाऊ विमानांची पाहणी केली आहे.
पाकिस्तानी लष्करप्रमुख राहिल शरीफ यांच्याकडून लढाऊ विमानांची पाहणी करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती. तसेच त्यांनी लाहोर पेशावर येथील लष्करी परिस्थितीचीही पाहणी केली.
दरम्यान, रविवारीच पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) नासिर जंजुआ आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यात फोनवरुन चर्चा झाली होती. डोभाल आणि जंजुआ यांच्यात दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासंदर्भात बातचीत झाली होती. त्यामुळे एकीकडे अशाप्रकारची चर्चा सुरु करुन भारताला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली लष्करी यंत्रणा सुसज्ज ठेवायची अशीच पाकची दुहेरी योजना दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे पाकिस्तानचं पुढचं पाऊल काय असणार आहे याकडे भारताचं लक्ष असणार आहे.