इस्लामाबाद : जमात उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या आर्थिक नाड्या आवळायला पाकिस्तान सरकारने सुरुवात केली आहे. हाफिज सईदच्या संस्था आणि आर्थिक संपत्ती पाकिस्तान सरकार ताब्यात घेणार आहे.


प्रांतीय सरकार आणि विभागला पाठवलेल्या गुप्त आदेशात सरकारच्या या प्लॅनचा उल्लेख आहे. हाफिज सईदशी संबंधित सगळ्या संस्था आणि त्याला पुरवठा करणाऱ्या आर्थिक संघटनांवर पाकिस्तान सरकारतर्फे टाच आणण्यात येणार आहे.

अमेरिकेने हाफिज सईदला दहशतवादी घोषित केलं आहे. याशिवाय त्याच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या संघटनांनाही दहशतवादी संघटनेच्या श्रेणीत ठेवलं आहे.

हाफिज सईदला पुन्हा डांबलं, आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तान नमलं

गुप्त आदेशात कारवाईचा उल्लेख
- 19 डिसेंबर रोजी परराष्ट्र मंत्रालयाने कायदा विभाग आणि पाकिस्तानच्या पाच प्रांतांमधील सरकारकडून सईदची संपत्ती ताब्यात घेण्यासाठी अॅक्शन प्लॅन मागवले होते.

- 19 डिसेंबरची ही कागदपत्र ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स इश्यूज’(FATF) कडे पाठवण्यात आली होती. यामध्ये सईदच्या दोन्ही संस्थांविरोधात कारवाई करण्याचा उल्लेख होता.

- FATF ही मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फायनान्सिंगसारख्या प्रकरणात कारवाई करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याप्रकरणी या संस्थेकडून पाकिस्तानला इशारा मिळाला होता.

पाकिस्तानने धोका दिला, आता आर्थिक मदत नाही, डोनाल्ड ट्रम्प बरसले

सईदवर पाकिस्तानची पहिली मोठी कारवाई
- जर पाकिस्तान सरकारने या प्लॅनवर अंमलबजावणी केली तर हाफिज सईदच्या नेटवर्कवरील ही मोठी कारवाई असेल. जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनचे पाकिस्तानात सुमारे 300 मदरसे आणि शाळा आहेत. याशिवाय अनेक हॉस्पिटल, प्रकाशन संस्था आणि अॅम्ब्युलन्स सेवाही चालवल्या जातात.

- पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे 50 हजारहून जास्त स्वयंसेवक आणि कर्मचाशी या दोन्ही संघटनांमध्ये काम करतात.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद निवडणूक लढणार

कोण आहे हाफिज सईद?
- हाफिज सईद हा दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख आहे. तसंच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा तो सह-संस्थापकही आहे. भारतातील अनेक दहशतवाई हल्ले या दोन संघटनांनी केले आहे. हाफिज सईद हा मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.

- अमेरिकेने हाफिज सईदवर  एक कोटी डॉलरचं इनामही जाहीर केलं आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे.