पाकिस्तानने धोका दिला, आता आर्थिक मदत नाही, डोनाल्ड ट्रम्प बरसले
एबीपी माझा वेब टीम | 01 Jan 2018 08:00 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या धोकेबाजपणावर आज जोरदार बरसले.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या धोकेबाजपणावर आज जोरदार बरसले. अमेरिकेने पाकिस्तानला मदत केली, त्याबदल्यात आम्हाला धोका मिळाला, आता आर्थिक मदत केली जाणार नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? "गेल्या 15 वर्षात अमेरिकेने मूर्खपणे पाकिस्तानला 2 लाख कोटींपेक्षा जास्त मदत पुरवली. बदल्यात फक्त खोटारडेपणा आणि धोका मिळाला. आम्ही अफगाणिस्तानात ज्या अतिरेक्यांना शोधत होतो पाकिस्तान त्यांना आपल्या घरात आश्रय देत होतं, आता अजून मदत नाही", असं ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. लवकरच जगाला सत्य सांगू : पाकिस्तान पाकिस्ताननेही डोलान्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. आम्ही लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्वीटला उत्तर देऊ. जगाला लवकरच सत्य सांगू, असं ट्वीट पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा असिफ यांनी केलं आहे.