इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदेत नाट्यमय घडामोडी घडल्या. पाकिस्तानच्या संसदेने पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात मांडलेला अविश्वास ठराव फेटाळला आहे. यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित केलं. अविश्वास ठराव फेटाळण्याचा निर्णय योग्यच आहे. आपण राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे संसद विसर्जित करुन पुन्हा निवडणुका घेण्याची शिफारस केल्याचं इम्रान खान म्हणाले. दरम्यान विरोधक आता कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. 


पाकिस्तान संसदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर अविश्वास ठराव मांडण्यात आला. मात्र मंत्री फवाद चौधरी यांनी संविधानाच्या काही कलमांचा दाखला देत सभापतींना विनंती केली की हा प्रस्ताव घटनाबाह्य आहे. यानंतर उपसभापतींनी इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव फेटाळला. यानंतर सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी झाली. विरोधी पक्षाचे नेत्यांनी इम्रान खान यांच्याविरोधा घोषणा दिल्या. परदेशी शक्ती पाकिस्तानचं सरकार पाडण्याचा षडयंत्र रचत असल्याचं उपसभापती म्हणाले.


इम्रान खान यांचं देशाला संबोधन
यानंतर इम्रान खान यांनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले की, "मी सभापतीच्या निर्णयानंतर प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाचे आभार मानतो. अविश्वास ठराव हा आमच्याविरोधातील परकीय षडयंत्र होतं. पाकिस्तानी नागरिकांना ठरवायचं आहे की देशावर कोणाचं शासन असावा. कोणत्याही परदेशी शक्तींना हे ठरवण्याचा अधिकार नाही. मीराष्ट्रपतींना संसद विसर्जित करण्याची शिफारस केली आहे. लोकशाही मार्गाने निवडणुका व्हायला हव्या. मी पाकिस्तानच्या नागरिकांना नव्या निवडणुकीची तयारी करण्याचं आवाहन करतो." 


बिलावल भुट्टो यांचं धरणं आंदोलन
बिलावल भुट्टो यांनी सभागृहातच धरणं आंदोलन केलं. भुट्टो हे उपसभापतींच्या निर्णयाने नाराज आहे. सुरुवातीला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर बिलावल भुट्टो यांनी संसदेत धरणं आंदोलन केलं.