Imran Khan Slams Pak Govt Over Fuel Price Hike : पाकिस्तानमधील राजकीय आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती 30 रुपयांनी वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये आता जनतेला पेट्रोलसाठी 179.86 रुपये आणि डिझेलसाठी 174.15 रुपये प्रति लिटर मोजावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शाहबाज शरीफ सरकारला घेरले आहे. त्यांनी पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारला असंवेदनशील म्हटलं आहे.


इम्रानचा शाहबाजवर हल्लाबोल, भारताचे कौतुक


इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, अमेरिकेच्या मित्र राष्ट्राने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून इंधनाचे दर प्रतिलिटर 25 रुपयांनी कमी केले आहेत. इमरान खान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांची वाढ करून देशातील जनता आयात केलेल्या सरकारला विदेशी मालकांच्या अधीन करण्याची किंमत मोजत आहे.






 


आमच्या कराराचा पाठपुरावा केला नाही -इम्रान खान


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे 30 रुपयांची वाढ केल्यानंतर शाहबाज शरीफ सरकारवर टीका केली आहे. सरकारवर टीका करताना, इम्रान म्हणाले की या "असंवेदनशील सरकारने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने रशियासोबत 30 टक्के स्वस्त तेलासाठी केलेला करार पुढे नेला नाही, आमच्या कराराचा पाठपुरावा केला नाही. 



पाकिस्तान सरकार असंवेदनशील - Imran Khan


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, ही एकाच वेळी झालेली सर्वात मोठी वाढ आहे. अक्षम आणि असंवेदनशील सरकारने रशियाशी आमच्या कराराचा पाठपुरावा केला नाही. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषदेत किमतींबाबत घोषणा केली, जिथे ते म्हणाले की, सरकारकडे किंमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्हाला टीकेला सामोरे जावे लागेल, पण देशाचे हित आमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि ते वाचवणे आमच्यासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणाले होते.