Pakistan: पाकिस्तानात आर्थिक संकट दिवसानुदिवस वाढताना दिसत आहे. देशातील नागरिकांना आपल्या सर्वसामान्य गरजा पूर्ण करण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तान जगभरातील बलाढ्य देशांकडे मदतीसाठी याचना करत आहे. अशातच पाकिस्तानातील सर्वसामान्यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने (SBP) सोमवारी बेंचमार्क व्याज दर 100 बेस पॉइंट्सने वाढवून 17 टक्क्यांवर नेला आहे. जो ऑक्टोबर 1997 नंतरचा उच्चांक आहे. एसबीपी गव्हर्नर जमील अहमद यांनी ऑगस्टमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या पतधोरण पत्रकार परिषदेत खुलासा केला की, महागाईचा दबाव कायम आहे आणि तो व्यापक आहे." याबाबत जिओ न्यूजने वृत्त दिले आहे.
ते म्हणाले की, "हे व्याज दर अनियंत्रित राहिल्यास त्यामुळे अपेक्षेपेक्षा दीर्घ कालावधीसाठी उच्च चलनवाढीची अपेक्षा ठेवू शकतात. त्यामुळे चलनविषयक धोरण समितीने (MPC) यावर जोर दिला की, भविष्यातील शाश्वत वाढीला पाठिंबा देण्यासाठी महागाईच्या अपेक्षा स्थिर करणे आणि किंमत स्थिरतेचे उद्दिष्ट साध्य करणे महत्त्वाचे आहे.''
जिओ न्यूजने वृत्त दिले आहे की, वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी सेंट्रल बँकेने सप्टेंबर 2021 पासून बेंचमार्क व्याजदर 100 बेस पॉईंट्सने (bps) वाढवला आणि एकूण वाढ 1,000 bps वर नेली. गव्हर्नर म्हणाले की, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये काही प्रमाणात घट असूनही महागाई कायम आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या 10 महिन्यांपासून मूळ चलनवाढीचा दर वाढत आहे.
पाकिस्तानमध्ये डॉलरच्या तुलनेत एक रुपयाची किंमत घसरली
पाकिस्तानमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. तेथे एक रुपया डॉलरच्या तुलनेत 229.85 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांत पाकिस्तानी चलनाच्या मूल्यात 12 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. भारतीय चलनाबद्दल बोलायचे झाले तर येथे एका रुपयाचे मूल्य पाकिस्तानी रुपयाच्या जवळपास तिप्पट आहे. तसेच एका अमेरिकन डॉलरची किंमत भारतीय रुपयाच्या तुलनेत 80.98 रुपये आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाचा परकीय चलनाचा साठा कमी होत आहे आणि सोन्याचा साठाही त्याच दराने कमी होत आहे. यातच अडचणीच्या काळात पाकिस्तान सातत्याने जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि अनेक देशांकडे आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जागतिक बँकेने त्याला दणका दिला आहे. जागतिक बँक पाकिस्तानला 1.1 अब्ज डॉलरचे कर्ज देणार होते. मात्र त्यांनी आपला हा निर्णय तात्पुरती मागे घेतला आहे.