प्याँगयांग/ उत्तर कोरिया : नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उननं जगाला धमकी दिली आहे. ‘आपण हातात नेहमी अणू बॉम्बचं बटण घेऊन फिरत असल्याचं’ धक्कादायक वक्तव्य किम जोंग उन यानं आज नववर्षाच्या मुहुर्तावर केलं आहे. तसेच ही धमकी नव्हे; तर वस्तूस्थिती असल्याचंही किम जोंगने सांगितलं आहे.


गेल्या काही महिन्यांपासून उत्तर कोरियाने अण्वस्त्र कार्यक्रमाद्वारे संपूर्ण जगात तणावाची परिस्थिती निर्माण केली आहे. याच अण्वस्त्रांच्या जोरावर 2017 च्या शेवटच्या काही महिन्यांत उत्तर कोरियाने जगाला धमकावण्याचे सत्र सुरु केलं होतं. हेच सत्र त्याने पुन्हा सुरु ठेवलं आहे. “माझ्या हातात नेहमीच अणू बॉम्बचं बटण असतं. मी कुणालाही ब्लॉकमेल करत नाही. तर ही वस्तूस्थिती आहे,” अशी धमकी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंगने दिली आहे.

विशेष म्हणजे, आपला अण्वस्त्र कार्यक्रम यापुढेही तसाच सुरु राहिल, असा इशाराही त्याने दिला आहे. सीएनएनने कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (केसीएनए) च्या रिपोर्टवरुन सांगितलं की, “उत्तर कोरियाच्या धोरणांत यापुढेही बदलाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे.”

रिपोर्टमध्ये पुढे म्हटलंय की, “एक अजेय शक्ती म्हणून  उत्तर कोरियाच्या अस्तित्वाला कोणीही धक्का लावू शकत नाही. शिवाय त्याचे अस्तित्वही कोणी नाकारु शकत नाही. एक जबाबदार देश म्हणून उत्तर कोरियाने सर्व अडथळे पार करत स्वातंत्र्य आणि न्यायाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.”

अमेरिकेला इशारा देताना पुढे म्हटलंय की, “जोपर्यंत अमेरिका आणि त्याच्याशी संबंधित शक्ती अण्वस्त्रांचं धाक दाखवत राहिल. तोपर्यंत उत्तर कोरिया स्व-संरक्षणासाठी आणि संभावित हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अण्वस्त्र विस्ताराचा कार्यक्रम तसाच सुरु ठेवेल.”

या रिपोर्टमध्ये अमेरिकेच्या प्रमुख ठिकाणांवर हल्ला करण्याची प्योंगयांगच्या (उत्तर कोरियाची राजधानी) क्षमतेवरही भर देण्यात आला आहे. शिवाय, उत्तर कोरिया जागतिक अण्वस्त्र संपन्न देश बनल्याचंही यातून सांगण्यात आलं आहे.  तसेच, जर अमेरिकेकडून युद्धाला सुरुवात केल्यास, त्याचं चोख प्रत्युत्तर उत्तर कोरिया देईल, असंही या रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे.