इस्लामाबाद: खोटं बोलण्यात पटाईत असणाऱ्या पाकिस्तानने इम्रान खान पंतप्रधानपदी रुजू झाल्यानंतरही आपला खोटारडेपणा कायम ठेवला आहे.

पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दावा केला आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिठ्ठी लिहून दोन्ही देशांतील संवाद सुरु करण्याचे संकेत दिले. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे.

भारताने चिठ्ठी लिहिली आहे, मात्र त्यातील मजकूर तसा नाही. जो दावा पाकिस्तान करत आहे, ती त्यांची इच्छा असावी, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

दहशवादी कारवायांमुळे संवाद नाही
एकीकडे पाकिस्तान म्हणतंय की भारताने बातचीत करण्याबाबत म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत बातचीत शक्य नाही, अशी भारताची भूमिका आहे. 

पाकिस्तानने काश्मीर राग आळवला

दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पुन्हा काश्मीर राग आळवला. दोन्ही देशातील मुद्द्यांमध्ये काश्मीर एक सत्य आहे . त्यावर तोडगा निघणं आवश्यक आहे, असं कुरेशी म्हणाले.

काश्मीर मुद्द्यावरुन कुरेश यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख केला. वाजपेयींनी लाहोर आणि इस्लामाबादचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानबाहेरच्या मुद्द्यांवर सहमती दर्शवली होती. तसंच चर्चेशिवाय पर्याय नसल्याचं नमूद केलं होतं, असं कुरेशींनी सांगितलं.

पंतप्रधान इम्रान खान यांचाही काश्मीर राग

इम्रान खान यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच भाषणात भारत आणि अफगाणिस्तानवर अप्रत्यक्ष भाष्य केलं होतं. शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल, असं इम्रान खान म्हणाले होते.

संबंध सुधारण्यासाठी शांतीची गरज आहे. भारताने एक पाऊल टाकल्यास आम्ही दोन पावलं टाकू, असं इम्रान खान म्हणाले. त्याचवेळी त्यांनी दोन्ही देशांमध्ये काश्मीर हा एक मुद्दा आहे असंही नमूद केलं होतं.

आधी पंतप्रधान आणि आता परराष्ट्रमंत्री पाकिस्तानचे दोन्ही महत्त्वाचे नेते काश्मीर मुद्दा उपस्थित करत आहेत. म्हणजेच पाकिस्तानला भारताची चर्चा तर करायची आहे, मात्र काश्मीरचा मुद्दा समोर ठेवूनच. त्यामुळे ही चर्चा होते की नाही ते येणारा काळच ठरवेल.