ओटावा : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची आणि आनंददायी गोष्ट असते. सध्या प्री वेडिंग फोटोशूट, तसंच लग्नाचं फोटोशूट करण्याचा ट्रेण्ड आहे. लग्नातील प्रत्येक गोष्टी ठरवल्याप्रमाणे व्हाव्यात, असं सगळ्यांनाच वाटतं. पण तरीही अशा घटना घडतात की तो दिवस चांगल्या-वाईट गोष्टींसाठी कायम स्मरणात राहतो.


असाच प्रसंग कॅनडातील एका लग्नात घडला. क्लेटन कूक या वराने लग्नाच्या दिवशी एका बुडणाऱ्या मुलाला वाचवून सगळ्यांचीच मनं जिंकली.



क्लेटन कूक त्याची पत्नी ब्रिटनीसोबत लग्नाचं फोटोशूट करत होता. त्यावेळी ऑन्टारिओ पार्कमधील तलावात एक मुलगा बुडत असल्याचं त्याने पाहिलं. क्षणाचाही विलंब न लावता, क्लेटनने तात्काळ तलावात उडी मारली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढलं.

'हॅट फोटोग्राफी' फेसबुक पेजवर या संपूर्ण घटनेचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 'क्लेटन्स हिरोईजम', असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे.



ही पोस्ट अशी आहे की,
"काल रात्री क्लेटनच्या नावाने एक विशेष आरोळी ऐकू आली. मी नववधूचे फोटो काढत असताना, माझ्या मागे असलेल्या तलावात एक मुलगा बुडत होता. त्याचवेळी वधूने हे पाहिलं आणि तो ओरडली. पण त्याआधीच क्लेटनने तलावात उडी मारुन त्याला सुरक्षित बाहेर काढलं होतं. त्याच्या प्रसंगावधानामुळे बुडणारा मुलगा वाचला. वेल डन सर!"


'हॅट फोटोग्राफी'च्या पेजवरील ही पोस्टला तब्बल 8 हजार लाईक्स, लव्ह मिळाले आहेत. तर 2800 वेळा शेअर करण्यात आली आहे.