नवी दिल्ली : चीनच्या मदतीने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्ये भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान आणि चीनचा हा नापाक डाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उधळला. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमने पुराव्यांअभावी पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळला. चीनच्या मदतीने भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा पाकिस्तानचा हा काही पहिला प्रयत्न नाही. याआधीही पाकिस्तानने अशा कुरापती केल्या आहेत.


संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बुधवारी (2 सप्टेंबर) 1267 अल कायदा प्रतिबंध समितीनुसार दोन भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचे इस्लामाबादचे प्रयत्न फेटाळले.


अंगरा अप्पाजी आणि गोबिंद पटनायक या दोन भारतीय नागारिकांना दहशतवादी घोषित करण्याचे पाकिस्‍तानचे प्रयत्न, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियमने टेक्निकल होल्डच्या माध्यमातून रोखले. या प्रकरणात पुरावे सादर करा, अशी मागणी या देशांनी पाकिस्तानकडे केली होती.


स्वत:प्रमाणे भारताची प्रतिमा बिघडवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. परंतु भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यासाठी पाकिस्तानकडे कोणतेही पुरावे नव्हते. जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहरला 1267 समितीने जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात भारताचा मोठा वाटा होता. भारताच्या या यशानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.


पाकिस्‍तानकडून चार भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न
खरंतर पाकिस्‍तानने अंगरा अप्पाजी, गोबिंद पटनायक, वेणुमाधव डोंगरा आणि अजय मिस्त्री या एकूण चार भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्‍तान अफगाणिस्‍तानातील विकासकामांशी संबंधित भारतीय नागरिकांवर नजर ठेवत आहे. या नागरिकांवर पाकिस्तान बिनबुडाचे आरोप करुन त्यांचा संबंध दहशतवादी घटनांशी जोडत आहे. पाकिस्‍तानचे हे चारही प्रस्‍ताव सुरक्षा परिषदेच्या सदस्‍यांनी फेटाळल्यानंतर पाकिस्तानची समितीसमोर पोलखोल झाली आहे.


मागच्या वेळेप्रमाणे यावेळी पाकिस्‍तानला भारतीय नागरिकांविरोधात पुरेसे पुरावे देता आले नाहीत. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्‍तान तोंडावर आपटल्यानंतर यूएनमधील भारताचे कायम प्रतिनिधी टीएस त्रिमूर्ती यांनी ट्वीट करुन म्हटलं की, "दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचे पाकिस्‍तानचे प्रयत्न सुरक्षा परिषदेने धुडकावले आहे. पाकिस्‍तानचा हा नापाक डाव ब्लॉक करणाऱ्या देशांचे आम्ही आभार मानतो."