पेशावार : पाकिस्तानमधील पेशावरमधल्या मदरशात बॉम्बस्फोट झाला आहे. दिर कॉलनीत असलेल्या मदरशाजवळ झालेल्या या बॉम्बस्फोटात पाच मुलांचा मृत्यू झाला असून 70 लोक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. जखमी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरु आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांकडून मिळत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मदरशात झालेला बॉम्बस्फोट टाईम बॉम्बमुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांतील हा अत्यंत मोठा स्फोट मानला जात आहे. या बॉम्बस्फोटामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
पाकिस्तानच्या डॉन न्यूजने पोलिसांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत 5 मुलांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. हा स्फोट टाईम बॉम्बमुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्याकडून तपास सुरु आहे.
खैबर पख्तुनख्वाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'स्फोटात जखमी झालेल्यांना एलआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाच्या कारणांचा तपास सुरु आहे. या स्फोटामागचा नेमका उद्देश अद्यापपर्यंत समजलेला नाही. मदरशात मुलं अभ्यास करत असतानाच जोरदार स्फोट झाला,' अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटात झाला त्यावेळी मदरशात वर्ग सुरु होते. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये मुलांसोबतच शिक्षकांचाही समावेश आहे. सध्या स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु आहे.