लाहोरः पाकिस्तानची प्रसारण नियामक संस्था पेमराने पाकमध्ये टेलिव्हीजनवर आणि रेडिओवर कंडोमच्या जाहिरातींच्या प्रसारणासाठी बंदी घातली आहे.
सर्व माध्यमांनी कुटुंब नियोजन आणि कंडोमच्या जाहीरातींचं प्रसारण त्वरित थांबवावं अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी सूचना सर्व माध्यमांच्या कार्यालयाला पेमराने पाठवली आहे.
पेमरा संस्थेला कुटुंब नियोजन आणि कंडोमच्या जाहीरातींबाबत तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे कारवाई करताना पेमराने हा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या जाहीरातींमुळे लहान मुलांवर वाईट परिणाम होतो, अशा तक्रारी पेमराकडे दाखल झाल्या होत्या.
संयुक्त राष्ट्रानुसार पाकिस्तानच्या एक तृतीयांश नागरीकांना कुटुंब नियोजनाविषयी मार्गदर्शनच मिळत नाही. ज्यामुळे पाकििस्तानची लोकसंख्या दरवर्षी दोन टक्क्यांनी वाढत आहे.
दरम्यान पेमराच्या या निर्णयावर पाकिस्तानमध्ये सोशल मीडियातून जोरदार टिका होत आहे.