इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना कार्यरत असून या संघटना सातत्याने भारतासह आसपासच्या देशांमध्ये दहशतवादी कारवाया करतात, असा आरोप भारत नेहमीच करत आला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याबाबतचे पुरावेदेखील अनेकदा सादर केले आहेत. परंतु पाकिस्तानने ते कधीही मान्य केले नाहीत. परंतु आता मात्र पाकिस्तानने त्यांच्या देशात दहशतवादी आणि जिहादी संघटना असल्याचे मान्य केले आहे.

पाकिस्तानी सैन्याचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये दहशतवादी आणि जिहादी संघटना आहेत. या संघटनांवर आम्ही कारवाया करत आहोत. परंतु त्यांना संपवण्यासाठी अजून खूप काही करण्याची आवश्यकता आहे.

VIDEO | आमचा अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेला नाही, पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा | एबीपी माझा



गफूर म्हणाले की, कट्टरवादी आणि जिहादी संघटनांवर आम्ही बहिष्कार घातला आहे. आम्ही सातत्याने त्यांच्यावर कारवाया करत असतो. परंतु त्यांचा पूर्ण नाश करण्यासाठी बरीच कामं करावी लागणार आहेत. या दहशतवाद्यांमुळे पाकिस्तानचे आतोनात नुकसान झाले आहे. यापूर्वीची सर्व सरकारे या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात अयशस्वी ठरली आहेत.