''बाई केबिनमध्ये या'', पाकिस्तानी संसदेत महिला खासदाराचा अपमान
एबीपी माझा वेब टीम | 25 Jan 2017 01:31 PM (IST)
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या खासदार नुसरत सहर अब्बासी यांना पुरुष खासदाराने संसदेत अश्लील शब्द वापरल्याने त्यांनी स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिली आहे. दोन दिवसात संबंधित खासदारावर कारवाई न केल्यास आपण संसदेसमोर पेटवून घेऊ, असं नुसरत सहर यांनी म्हटलं आहे. संसदेत चर्चेदरम्यान मंत्री इमदाद पिताफी यांनी नुसरत सहर यांना आपल्या केबिनमध्ये येण्यास सांगितलं. त्यानंतर नुसरत सहर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ही संसदेबाहेर आंदोलन केलं. संसदेच्या उपाध्यक्ष एक महिला असूनही पिताफी यांच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हातात पेट्रोलची बॉटल घेत त्यांनी दोन दिवसात कारवाई न झाल्यास स्वतःला पेटवून घेण्याचा इशारा दिला. सोशल मीडियावर हे प्रकरण गेल्यानंतर पिताफी यांना टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी संसदेत माफी मागितली. मात्र नुसरत सहर पिताफींच्या राजीनाम्यासाठी आक्रमक आहेत. संसदेत महिला खासदारावर अशा प्रकारची भाषा वापरण्यात येत असेल, तर देशात कुणीही सरकारकडे पुन्हा न्याय मागणार नाही. शिवाय देशात महिलांचा किती आदर केला जातो, ते पिताफी यांनी दाखवून दिलं, असंही नुसरत सहर म्हणाल्या. VIDEO : नुसरत सहर यांची प्रतिक्रिया :