नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं असून भारतच अमेरिकेचा खरा मित्र असल्याचं म्हटलं आहे. काल रात्री ट्रम्प यांनी फोनवरुन मोदींशी संवाद साधला असता त्यावेळी हे निमंत्रण देण्यात आलं.
ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये दहशतवाद, संरक्षण आणि व्यापार वाढीच्या संदर्भात चर्चा झाली. दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चर्चा महत्वाची मानली जात आहे.
दरम्यान दहशतवादाविरोधात अमेरिका आणि भारत खांद्याला खांदा लावून लढेल, असं बोलणंही दोघांमध्ये झालं. व्हाईट हाऊसकडून ही माहिती देण्यात आली आहे.
8 नोव्हेंबरला डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणाऱ्या पाच देशांच्या प्रमुखांमध्ये मोदी यांचाही समावेश होता. 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान झाले.
21 जानेवारीला ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रेड्यू, 22 जानेवारीला इस्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू, 23 जानेवारीला इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष फतेह-अल-सिसी आणि काल पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.