नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचे दहशतवाद्यांशी संबध असल्याचे उघड झाले आहे. इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शहरयार आफ्रिदी याचा एक व्हिडीओ माध्यमांच्या हाती लागला आहे. या व्हिडीओत आफ्रिदी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्या हफीज सईदच्या संघटनेतील दहशतवाद्याशी बातचीत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये आफ्रिदी या दहशतवाद्याला आश्वस्त करतो की, "हफीज सईद यांच्या केसालादेखील धक्का लागू देणार नाही."


व्हिडिओत दिसत आहे, तो काळ्या कपड्यातला दाढीवाला हाफिज सईदचा जवळचा साथीदार आहे. या दहशतवाद्याच्या शेजारी बसलेला पांढऱ्या कपड्यातील दाढीवाला तरुण हा इम्रान खान यांच्या मंतिमंडळातील मंत्री शहरयार आफ्रिदी आहे.

पाकिस्तानी सरकार आणि दहशतवाद्यांचे संबध नाहीत, असतील तर त्याचे पुरावे दाखवा, असे तावातावाने ओरडणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खांन यांना या व्हिडीओने चांगलीच चपराक बसली आहे.

मुंबईवर 26/11 चा दहशतवादी हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या असणारा हाफिज सईद सध्या भारत आणि अमेरिकेच्या हिटलिस्टवर आहे. दोन्ही देशांना सईद हवा आहे. परंतु पाकिस्तान या दहशतवाद्याला पाठिशी घालत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. लष्कर-ए-तोयबा या संघटनेवर अमेरिकेने बंदी घातल्यानंतर पाकिस्तानमध्ये नेत्यांनी सईदला एक सल्ला दिला. या सल्ल्यानुसार सईदने त्याच्या संघटनेचे नाव 'फलाह-एइंसानियत फाऊंडेशन' असं ठेवलं.

VIDEO 




आफ्रिदी म्हणतो की, "पाकिस्तानमधलं इम्रान खान यांचं सरकार हाफिज सईदसोबत काहीही वाईट होऊ देणार नाही. हाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा' या संघटनेला पाकिस्तानी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाचा दर्जा देण्यास नकार दिला. परंतु आम्ही तुमच्या संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देऊ."