इस्लामाबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देण्याच प्रयत्न केला. मात्र नेहमीप्रमाणे इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचा दावा केला आहे. तसेच पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे द्यावे, असं आव्हानही इम्रान खान यांनी भारताला दिलं आहे.


पाकिस्तानवर हल्ला केल्यास चोख उत्तर देऊ - इम्रान खान


पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातवरण आहे. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याच मागणी भारतात जोर धरु लागली आहे. मात्र पाकिस्तानवर हल्ला केल्यास आम्हीही जोरदार प्रत्युत्तर देऊ अशी पोकळ धमकी इम्रान खान यांनी दिली आहे. भारत सरकारने आमच्यावर हल्ला केल्याचे आरोप केले आहेत. मात्र भारत पुरावे न देता पाकिस्तावर आरोप करत असल्याचा उटल्या बोंबा इम्रान खान यांनी मारल्या आहेत.


युद्ध सुरु करणे सोपं, थांबवणे कठीण - इम्रान खान

भारतात निवडणुका तोंडावर आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. मात्र पाकिस्तानवर भारताने हल्ला केल्यास, पाकिस्तान गप्प बसणार नाही. पाकिस्तानकडूनही भारताला चोख उत्तर दिलं जाईल. आम्ही युद्ध करण्याच्या बाजून नाहीत. कारण युद्ध सुरु करणे सोपं आहे. मात्र युद्ध थांबवणे कठीण आहे. दोन्ही देशांमधील वाद केवळ चर्चेतून सुटेल, असंही इम्रान खान म्हणाले.

पुलवामा हल्ल्याबाबत पुरावे द्यावे - इम्रान खान


पाकिस्तान भारतावर हल्ला का करेल? भारतावर हल्ला करुन पाकिस्तानला काय मिळणार आहे? भारताने पुलवामा हल्ल्याबाबत काही पुरावे दिल्यास, याप्रकरणी पाकिस्तान चौकशी करण्यास तयार असल्याचं आश्वासन इम्रान खान यांनी  दिलं. मात्र पूर्वानुभव पाहता, विविध दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने पुरावे सादर करुनही त्यात पाकिस्तानचा हात असल्याच दाखवून दिलं. मात्र प्रत्येकवेळी पाकिस्ताननं आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून भारत यावेळीही वेगळी अपेक्षा ठेवणार नाही.


 

भारतासोबत चर्चा करण्यास तयार - इम्रान खान


दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही भारतासोबत चर्चा करण्यास तयार आहोत. आम्ही दहशतवाद संपवण्याच्या बाजूने आहोत. दहशतवादाचा पाकिस्तानलाही मोठा फटका बसत आहे. काश्मीरमधील तरुणांना मरणाची भीती उरलेली नाही. त्यामुळे काश्मीरमधील प्रश्न लष्करी कारवाईने सुटणार नाही, असंही इम्रान खान यांनी म्हटलं.